आला रंगारी श्रावण
आला रंगारी श्रावण..अजित शेडगे असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो,सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखीतो !पावसाळा सुरू झाला की रानाला हिरवं स्वप्न पडतं आणि दऱ्या डोंगर सारे हिरवा शालू नेसतात. जेष्ठ महिन्यात सुरू झालेला पाऊस आषाढात धपाधपा कोसळतो आणि श्रावणात जरासा पोक्त झालेल्या चालिसीतल्या प्रौढांसारखा शांत ,सयंत आणि संयम आल्यासारखा बरसतो .रायगडच्या मातीत तर या श्रावणाची मजा काही औरच असते.दरी डोंगर साजिरे,गोजिरे होतात .नद्या नाले दुथडी भरून वाहतात.गावकुसाबाहेर ओहोळ खळखळ आवाज करतात आणि लहानमोठ्या धबधब्यांची गाज कानावर सतत पडत राहते.शेतातील लावणीची कामे आटोपलेली असतात.बळीराजा निवांत झालेला असतो. हिरवीगार शेतं तरारून येतात आणि ताठ कण्याने माथा वर काढतात.अतिशय विलोभनीय असे दृष्य रायगडच्या प्रत्येक गावागावात शिवारात पहायला मिळते. रायगडात श्रावण निसर्गाच्या सौदर्याने बहरतो तसाच तो सण आणि आनंदाची उधळण गावागावात आणि घराघरात करतो. अगदी हा आनंद रायगडच्या मातीत ठासून भरल्यासारखा असतो.प्रत्येक वर्षीचा, प्रत्येक दिवसाचा आणि श्रावणातील प्रत्येक सणाचा आनंद, वेगळाच अवर्णनीय आणि अद्वितीय असाच असतो. भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार श्रावण हा पाचवा महिना .श्रावणातील पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो.त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे.खरं तर सर्व सणांचा आणि निसर्गातील विलोभनीय अशा सौदर्याचा हा महिना निसर्ग , मानव आणि पर्यावरण यांची सांगड घालणारा आहे.निसर्गाचं मुक्त हस्त दान लाभलेल्या रायगडात या महिन्याचे कोडकौतुक आणि गावागावातील रुबाब काही औरच असतो.सण उत्सवात हा महिना कसा निघून जातो ते कोणालाच कळत नाही. पावसाचा कमी होत जाणारा जोर,ओसरलेली वादळे आणि ढगांचा कमी झालेला गडगडाट यामुळे श्रावणातील पाऊसही हवा हवासा वाटणारा असाच असतो .अशा या श्रावणाचे कोडकौतुक करायचे आणि पहायचे असेल तर शेजारी दरीया आणि हिरव्यागार डोंगराची कूस असलेल्या रायगडच्या मातीतच अनुभवावा आणि पहावा.श्रावण आणि सण -श्रावणात अनेक प्रकारचे सण उत्साहाने साजरे होतात. म्हणून तर श्रावणाला सणांचा राजा म्हणतात.सासुरवाशिणी माहेराला येतात.झोका,झिम्मा ,फुगडी आणि फेराची गाणी गातात. अशा या श्रावणात सण आणि संस्कृतीचा सूंदर मिलाफ झालेला दिसतो.*नागपंचमी -श्रावणातील पंचमीला साजरा होणारा हा सण संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचे उत्तम उदाहरण आहे. शेतकऱ्यांचा खरा मित्र असलेला साप शेतातील उंदीर आणि कीटकांचा नाश करतो.एका अर्थी शेतीचे रक्षण करणारा साप शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे.अशा या सापाचे घरोघरी प्रतिकात्मक पूजन नागपंचमीला केले जाते. स्त्रिया सापाला आपला भाऊ मानून गोमेटीची वेल (नागवेल) घरात आणून पूजा करतात.गाणी म्हणतात, घराघरात मोदकाचा प्रसाद बनवितात.पर्यावरण रक्षणात सापांचे असलेले महत्व या निमित्ताने अधोरेखित होते.*नारळी पौर्णिमा ,रक्षाबंधन -श्रावण जसा पर्यावरणाला जोडणारा आहे.तसाच तो माणसांनाही जोडतो.नव्या मोहिमांना तो जन्मही देतो. पावसाच्या सुरुवातीला थांबलेला सगरावरील प्रवास नारळी पौणिमेला सागराला नारळ अर्पण करून पुनः सुरू होतो.सागर शांत व्हावा म्हणून रत्नाकराची पूजा केली जाते.कोळी बांधव व समुद्राशी निगडित असलेल्या व्यवसायातील लोक या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून पुनः समुद्रातील मासेमारीला सुरुवात करतात. श्रावण जसा समुद्राशी नाते सांगतो तसा तो नात्यांची गुंफनही करतो. याच दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते .आपले प्रेम,स्नेहभाव यानिमिताने व्यक्त करून अतूट अशा नात्याचे बंध निर्माण करते.एक आगळावेगळा सोहळा या निमित्ताने घरोघरी साजरा होतो.*श्रावण वद्य अष्टमी- गोपाळ काला एकतेचा आणि एकात्मतेचा संदेश देणारा सण रायगडातील गावागावात अगदी उत्साहाने साजरा होतो.गोकुळाष्टमीचा उपवास आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी होणारा दहीहंडीचा उत्सव एक वेगळाच उत्साह या निमित्ताने दिसतो.हातात हात घालून ,फेर धरून अख्या गावात गोविंदा जातो. घराघरातील पाणी घेत दही ,दूध खात गोविंदाच्या गाण्यावर गावातील ग्रामस्थ एकीचे दर्शन घडवितात.जात,धर्म आणि पंथाच्या सीमारेषा पुसणारा असा हा दहीहंडीचा सोहळा होतो.*पिठोरी अमावश्या-स्त्रिया हा सण आनंदाने करतात.या दिवशी नाच गाणी खेळ करतात.काही ठिकाणी शेतकरी पोळा नावाचा सण साजरा करतात.बैलांना साज शृंगार करून त्यांची मिरवणूक काढतात.*देशप्रेमाचा महिना- श्रावण जसा संस्कृती जतणाचा तसाच देशप्रेमाचा असतो.याच महिन्यात ९ ऑगस्ट क्रांती दिन व १५ ऑगस्ट स्वातंत्र्याचा विजयोत्सव येतो.एकअर्थी देशप्रेम आणि सणांचा जल्लोष याच महिन्यात असतो.*श्रावण आणि आरोग्य-उत्तम आरोग्यासाठी आणि तंदुरुस्तीकरिता योग्य असे वातावरण या महिन्यात असते.रानभाज्यांचा सुकाळ,वातावरणातील आल्हाददायक पणा यामुळे उत्तम आरोग्य व तंदुरुस्तीसाठी श्रावण म्हणजे पर्वणीच असतो.*गावोगाविचा श्रावण-रायगडातील गावे या महिन्यात शांत ,निवांत आणि उत्साहित असतात .गावातील मंदिरातून पोथी ,पुराणांचे वाचन होते. भाविक महिला ,पुरुष श्रवण भक्तीत तल्लीन होतात.श्रावण सोमवार ,शनिवारी मंदिरातून आरतीचे स्वर उमटतात ,देव दर्शनाला रांगा लागतात.असे भक्तिमय वातावरणात गावागावात याच महिन्यात दिसते.Show quoted text
